प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव :मतदार संघातील बांधकाम कामगारांच्या वर्षानुवर्षे रखडलेल्या प्रलंबित प्रकरणांना अखेर गती मिळू लागली असून,आमदार रोहित आर. आर. पाटील यांच्या पुढाकारामुळे पहिल्याच बैठकीत ७० प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली.तासगाव येथील शासकीय विश्रामगृहात आमदार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बांधकाम कामगार समितीच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.बांधकाम कामगारांच्या विविध योजनांशी संबंधित अनेक प्रस्ताव मागील काही महिन्यांपासून कागदपत्रांच्या तपासणीअभावी प्रलंबित होते. त्यामुळे लाभापासून वंचित राहिलेल्या कामगारांमध्ये तीव्र नाराजी होती.या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पाटील यांनी प्रशासनाची विशेष बैठक बोलावून रखडलेल्या प्रस्तावांचा थेट आढावा घेतला.या बैठकीत प्राथमिक स्तरावरील पूर्तता झालेल्या ७० प्रकरणांवर तात्काळ सकारात्मक निर्णय घेण्यात आला. त्यामुळे संबंधित बांधकाम कामगारांना मोठा दिलासा मिळाला आहे.एवढ्यावरच न थांबता, येत्या दोन आठवड्यांत तब्बल २ हजारांहून अधिक प्रकरणे निकाली काढण्याचे लक्ष्य प्रशासनासमोर ठेवण्यात आले आहे.बैठकीत आमदार पाटील यांनी प्रशासनाला स्पष्ट शब्दांत निर्देश दिले की,“कामगारांना योजनांचा लाभ मिळण्यात होणारा विलंब आता सहन केला जाणार नाही. प्रलंबित प्रकरणांतील कागदपत्रांची तपासणी तातडीने पूर्ण करून पात्र लाभार्थ्यांना न्याय द्यावा.”
अनेक महिन्यांपासून प्रकरणे प्रलंबित ठेवणाऱ्या यंत्रणेला त्यांनी अप्रत्यक्षपणे जाब विचारत, अधिकाऱ्यांनी एकमेकांशी समन्वय साधून वेगाने काम करण्याची आवश्यकता अधोरेखित केली. कामगारांच्या हक्काच्या योजनांसाठी त्यांना वारंवार शासकीय कार्यालयांची पायरी झिजवावी लागू नये, यासाठी कार्यपद्धती अधिक सक्षम करण्यावरही भर देण्यात आला.या निर्णयामुळे तालुक्यातील बांधकाम कामगारांमध्ये आशावादाचे वातावरण निर्माण झाले असून, प्रलंबित प्रस्तावांच्या निवारणाला आता प्रत्यक्ष गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ वेळेत मिळवून देण्यासाठी प्रशासनाने संवेदनशीलता दाखवणे गरजेचे असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.बैठकीस बांधकाम कामगार समितीचे अधिकारी, तालुक्यातील बांधकाम कामगार, संबंधित पदाधिकारी आणि प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते. कामगारांच्या प्रश्नांवर आमदार रोहित पाटील यांनी घेतलेल्या ठाम भूमिकेमुळे रखडलेल्या प्रस्तावांच्या मंजुरीचा मार्ग आता वेगाने मोकळा होणार असल्याचे बोलले जात आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या