सांगली प्रतिनिधी : ताकारी (ता. वाळवा) येथील महालक्ष्मी ज्वेलर्स या सराफ दुकानाच्या भिंतीला भगदाड पाडून सोने-चांदी व रोख रक्कम लुटणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली यांनी अटक केली आहे. या कारवाईत चार आरोपींना जेरबंद करण्यात आले असून तब्बल १० लाख ४१ हजार ६१४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी ईश्वरपूर पोलीस ठाण्यात अपराध क्र. ४७६/२०२५ अन्वये बी.एन.एस. कलम ३०५ (अ), ३३१ (३), ३३१ (४) प्रमाणे गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात फिर्यादी महेश हणमंत पाटील (व्यवसाय – सराफ, रा. बांबवडे, ता. पलूस, जि. सांगली) यांनी तक्रार दिली आहे.
दिनांक १२ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ६ ते १३ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १०.३० या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या मागील भिंतीला लोखंडी पारीने भगदाड पाडून दुकानातील सोन्याचे, चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली होती.
या गंभीर घरफोडी चोरीच्या घटनेची दखल घेत पोलीस अधीक्षक संदीप घुगे व अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे (स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली) यांनी तपासाचे आदेश दिले.
त्यानुसार दिनांक १८ डिसेंबर २०२५ रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर व पथक सांगली शहरात पेट्रोलिंग करीत असताना पुष्पराज चौक परिसरात पोहेकॉ संदीप पाटील व पोहेकॉ प्रकाश पाटील यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली. सांगलीवाडी टोलनाका परिसरात दोन दुचाकींवरून संशयित इसम चोरीचे दागिने विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळताच पथकाने सापळा रचून चार संशयितांना ताब्यात घेतले.
ताब्यात घेतलेल्या आरोपींची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडून १९.०८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, ३ किलो ४४० ग्रॅम चांदीचे दागिने, रोख रक्कम व दोन मोटारसायकली असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
चौकशीत आरोपी प्रदीप हणमंत थोरात (वय ३६, रा. बोरगाव, ता. वाळवा) याने साथीदार
गणेश ऊर्फ अजित शांताराम मागनगिरी (वय ३०),
सुरेश गंगाराम कोळी (वय २५, रा. कोल्हापूर)
आकाश अंकुश सावंत (वय ३०, रा. लेंगरे, ता. खानापूर)
आणि फरार आरोपी राजकुमार भरत मच्छवे (रा. दरफळ, जि. धाराशिव) यांच्यासह ताकारीतील ज्वेलर्स दुकान फोडल्याची कबुली दिली.
सदर मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आला असून आरोपींना पुढील तपासासाठी ईश्वरपूर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आले आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गायकवाड करीत आहेत.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या