सांगली प्रतिनिधी दि. 17 : बोगस डॉक्टरांबाबत जनजागृतीसाठी स्थानिक प्रशासनाच्या सर्व प्रसिध्दी माध्यमांचा प्रभावी वापर करावा. बोगस व मान्यताप्राप्त अशा दोहोंबाबत जनजागृती करावी, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी विजया पांगारकर यांनी दिले.
जिल्हास्तरीय पुनर्विलोकन समितीची बैठक निवासी उपजिल्हाधिकारी विजया पांगारकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. बैठकीस पोलीस उपअधीक्षक (गृह) सुरेखा दुग्गे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा सरकारी अभियोक्ता ॲड. अरविंद देशमुख, ग्राहक संघटनेचे डॉ. ज्ञानचंद्र पाटील, सुरेश भोसले यांच्यासह तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते.
निवासी उपजिल्हाधिकारी विजया पांगारकर म्हणाल्या, बोगस डॉक्टरांच्या शोध मोहिमेंतर्गत छापे टाकताना छापे परिणामकारक असतील याची दक्षता घ्यावी. महानगरपालिका व नगरपालिका क्षेत्रात जनजागृतीसाठी मोठ्या प्रमाणावर डिजीटल जाहिराती कराव्यात. आवश्यक तेथे औषधे व इतर साहित्यांची नमुने तपासणी करावी. मॅजिक रेमिडीज कायद्यानुसार आक्षेपार्ह जाहिरांतीवर कठोर कारवाई करावी. अशा प्रकारच्या जाहिराती आढळल्यास त्वरित यंत्रणांना पाठवावी. त्यासाठी क्षेत्रीय स्तरावरील कर्मचाऱ्यांना समाविष्ठ करून घ्यावे, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
या बैठकीत सर्व तालुका आरोग्य अधिकारी, प्राथमिक आरोग्य अधिकारी यांना अवैद्य/बोगस वैद्यकीय व्यवसायिकांचे सर्व्हेक्षण करून माहिती सादर करण्याबाबत कळविण्यात आल्याचे सांगितले. बैठकीत बोगस डॉक्टरांबाबत जनजागृती, उपचारांबाबत दिशाभूल करणाऱ्या जाहिराती, बोगस डॉक्टरांवर कारवाई करिता धडक मोहिमा आदिच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा करण्यात आली. न्यायालयात दाखल असलेल्या प्रकरणांबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली.
बोगस डॉक्टरांबाबत जनजागृतीसाठी स्थानिक प्रशासनाच्या सर्व प्रसिध्दी माध्यमांचा प्रभावी वापर करा : निवासी उपजिल्हाधिकारी विजया पांगारकर
By -
मार्च २०, २०२५
0
प्रतिष्ठा न्यूज
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या