मिरज : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बस प्रवासात महिला लाभार्थ्यांना मिळणाऱ्या प्रवासभाड्यातील सवलतीचा लाभ घेण्यासाठी एनसीएमसी (NCMC) कार्ड अनिवार्य करण्यात आले होते. मात्र, महिला लाभार्थ्यांची मोठी संख्या लक्षात घेता अद्याप अनेक महिलांची कार्ड नोंदणी व वितरण प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. विशेषतः ग्रामीण भागातील महिलांमध्ये या कार्डबाबत माहितीचा अभाव असल्याचे निदर्शनास आले आहे.
या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या सवलतीचा लाभ घेण्यासाठी एनसीएमसी कार्डची अनिवार्यता तात्पुरती शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार ७ नोव्हेंबर २०२६ ते ३१ डिसेंबर २०२६ या कालावधीत महिलांना एनसीएमसी कार्डशिवायही एसटी प्रवासभाड्यातील सवलतीचा लाभ घेता येणार आहे.
दरम्यान, ज्या महिला लाभार्थ्यांनी अद्याप एनसीएमसी कार्डसाठी नोंदणी केलेली नाही, तसेच ज्यांना सवलतीचा लाभ मिळवण्यासाठी कार्ड आवश्यक आहे, त्यांनी एसटी महामंडळाच्या अधिकृत एजंटमार्फत एनसीएमसी कार्डसाठी नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन मिरज आगार व्यवस्थापक (वाहतूक) यांनी केले आहे.
महिला प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आणि जास्तीत जास्त महिलांना शासनाच्या प्रवास सवलतीचा लाभ मिळावा, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या