प्रतिष्ठा न्यूज / किरण कुंभार
तासगाव : राजकारणात कोणालाही कायमचे संपवता येत नाही, याचा प्रत्यय सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा आला आहे. माजी खासदार संजयकाका पाटील यांना राजकारणातून कायमचे संपवण्याच्या वल्गना करणाऱ्या आमदार रोहित पाटील यांच्या गटाला तासगाव तालुक्यात सलग तिसऱ्यांदा राजकीय धक्का बसला आहे. तासगाव नगरपालिका, पंचायत समिती आणि आता जिल्हा बँकेच्या निवडणुकीत संजयकाका पाटील यांनी आपली ताकद दाखवून दिली आहे. सोसायटी गटातील अत्यंत चुरशीच्या लढतीत संजयकाका पाटील यांनी माजी आमदार सुमन पाटील यांचा अवघ्या दोन मतांनी पराभव करत विजय मिळवला. संजयकाका पाटील यांना ४०, तर सुमन पाटील यांना ३८ मते मिळाली. एक मत अवैध ठरले. या निकालाने तासगावच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, रोहित पाटील गटाच्या राजकीय रणनीतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
संजयकाका पाटील यांना जिल्ह्याच्या राजकारणातून हद्दपार करण्यासाठी अनेक राजकीय नेत्यांनी एकत्रित ताकद लावल्याची चर्चा होती. आमदार रोहित पाटील यांनीही संजयकाकांचा राजकीय बिमोड करण्याचा निर्धार केल्याचे वारंवार राजकीय वक्तव्यांतून दिसून आले. मात्र, प्रत्येक वेळी संजयकाका पाटील यांनी नव्या ताकदीने मैदानात उतरून आपले अस्तित्व सिद्ध केले आहे. जिल्ह्यातील अनेक बड्या नेत्यांचे पाठबळ असूनही रोहित पाटील गटाला जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अपेक्षित यश मिळवता आले नाही. उलट, संजयकाका पाटील यांनी थेट सुमन पाटील यांचाच पराभव केल्याने हा विजय त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.
संजयकाकांचा राजकीय कमबॅक!
तासगाव तालुक्यातील राजकारणात गेल्या काही काळापासून संजयकाका पाटील आणि आमदार रोहित पाटील यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. विधानसभा निवडणुकीत रोहित पाटील यांनी संजयकाका पाटील यांच्यावर विजय मिळवला होता. त्यानंतर संजयकाकांचा राजकीय प्रभाव कमी करण्यासाठी राजकीय हालचाली सुरू झाल्याचे चित्र होते. मात्र, त्यानंतर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनी वेगळेच चित्र समोर आणले.
तासगाव नगरपालिका निवडणुकीत रोहित पाटील गटाला अपेक्षित यश मिळाले नाही. त्यानंतर पंचायत समितीच्या निवडणुकीतही संजयकाका पाटील गटाने मुसंडी मारत अनेक वर्षांपासून प्रभाव असलेल्या पंचायत समितीवरील सत्ता आपल्या ताब्यात घेतली. गेल्या तीन-चार दशकांपासून असलेले राजकीय वर्चस्व बदलण्यात संजयकाका गटाला यश आले. आता जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत सुमन पाटील यांचा पराभव करून संजयकाकांनी तिसरा मोठा राजकीय धक्का दिला आहे.
त्यामुळे हा निकाल केवळ जिल्हा बँकेच्या एका जागेपुरता मर्यादित नसून तासगाव तालुक्यातील बदलत्या राजकीय समीकरणांचा महत्त्वपूर्ण संकेत मानला जात आहे.
८० सोसायट्यांपैकी बहुतांश सोसायट्यांवर रोहित गटाचा प्रभाव; तरी संजयकाकांनी मारली बाजी!
तासगाव तालुक्यात एकूण ८० विकास सोसायट्या आहेत. त्यापैकी एका विकास सोसायटीमध्ये मतदानाचा अधिकार कोणाला द्यायचा, याबाबत ठराव न झाल्याने संबंधित सोसायटीला मतदान प्रक्रियेत सहभागी होता आले नाही. त्यामुळे उर्वरित ७९ विकास सोसायट्यांच्या माध्यमातून मतदान पार पडले.
विशेष म्हणजे, तालुक्यातील बहुतांश विकास सोसायट्यांवर आमदार रोहित पाटील गटाचे वर्चस्व असल्याचे राजकीय चित्र होते. सोसायट्यांवरील प्रभाव, स्थानिक राजकीय समीकरणे आणि नेत्यांचे पाठबळ या सर्व बाबी सुमन पाटील यांच्या बाजूने असल्याचे मानले जात होते. तरीही प्रत्यक्ष मतदानात संजयकाका पाटील यांनी दोन मतांची आघाडी घेत विजय मिळवला. त्यामुळे सोसायट्यांवरील राजकीय वर्चस्व आणि प्रत्यक्ष मतदारांचा कौल यामध्ये मोठी तफावत असल्याचे या निकालातून स्पष्ट झाले.
निवडणूक प्रतिष्ठेची असल्याने दोन्ही गटांनी मतांची जुळवाजुळव करण्यासाठी मोठी ताकद लावली होती. मतदारांशी संपर्क, बैठका आणि मतदानापर्यंतची रणनीती यासाठी दोन्ही बाजूंनी विशेष नियोजन केले होते. तिसऱ्या आघाडीतील काही मतदारांनीही संजयकाका पाटील यांना साथ दिल्याची चर्चा निकालानंतर राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
आर. आर. पाटील कुटुंबाला संजयकाकांचा पहिलाच थेट धक्का!
या निवडणुकीतील सर्वाधिक चर्चेचा विषय म्हणजे संजयकाका पाटील यांनी आर. आर. पाटील कुटुंबातील सदस्याचा थेट निवडणुकीत पराभव केला. स्वर्गीय आर. आर. पाटील यांच्या पत्नी आणि विद्यमान आमदार रोहित पाटील यांच्या मातोश्री सुमन पाटील यांच्याविरोधात संजयकाका स्वतः मैदानात उतरले होते. त्यामुळे ही निवडणूक केवळ जिल्हा बँकेच्या संचालकपदाची नव्हती, तर दोन राजकीय घराण्यांच्या प्रतिष्ठेची लढाई बनली होती.
यापूर्वी विधानसभा निवडणुकीत रोहित पाटील यांनी संजयकाका पाटील यांच्यावर विजय मिळवला होता. त्यामुळे त्या पराभवाची राजकीय परतफेड करण्याची संधी संजयकाका पाटील यांच्यासमोर होती. अखेर सुमन पाटील यांचा दोन मतांनी पराभव करून त्यांनी ही प्रतिष्ठेची लढाई जिंकली. त्यामुळे तासगावच्या राजकारणात या निकालाची दीर्घकाळ चर्चा होण्याची शक्यता आहे.
नेत्यांचा गोतावळा मोठा; पण मतदारांचा कौल वेगळाच!
आमदार रोहित पाटील यांच्या सभोवताली समर्थक आणि सल्लागारांचा मोठा गोतावळा निर्माण झाल्याची चर्चा गेल्या काही काळापासून राजकीय वर्तुळात होती. विधानसभा निवडणुकीतील विजयामुळे निर्माण झालेला आत्मविश्वास काही वेळा अतिआत्मविश्वासात बदलतो का, असा प्रश्नही या निकालाने उपस्थित केला आहे.
नेत्यांच्या भोवती असणाऱ्या सल्लागारांनी केवळ स्तुती करण्याऐवजी जमिनीवरील वास्तवाची जाणीव करून देणे आवश्यक असते. सामान्य कार्यकर्ता, मतदार आणि स्थानिक पदाधिकारी यांच्याशी असलेला संवाद कमी झाला, तर त्याचे परिणाम निवडणुकीत दिसून येतात. राजकारणात केवळ मोठ्या नेत्यांचे पाठबळ किंवा सोसायट्यांवरील प्रभाव पुरेसा ठरत नाही. शेवटी मतदानाच्या दिवशी मतदार कोणाच्या बाजूने उभा राहतो, हेच निर्णायक ठरते.
जिल्हा बँकेच्या निकालाने हाच संदेश दिला आहे. संजयकाका पाटील यांना संपवण्याच्या राजकीय चर्चांना मतदारांनी आपल्या कौलातून उत्तर दिले आहे. त्यामुळे रोहित पाटील गटाने केवळ पराभवाची कारणमीमांसा न करता आपल्या राजकीय कार्यपद्धतीचे आत्मपरीक्षण करण्याची गरज निर्माण झाली आहे.
आता तरी रोहित पाटील अहंपणा सोडणार का?
तासगाव नगरपालिका, पंचायत समिती आणि जिल्हा मध्यवर्ती बँक अशा सलग तीन निवडणुकांतील धक्क्यांनी आमदार रोहित पाटील यांच्या नेतृत्वासमोर मोठे आव्हान उभे केले आहे. विधानसभा निवडणुकीतील विजय हा राजकीय प्रवासाचा शेवट नसतो, तर जनतेचा विश्वास कायम राखण्याची जबाबदारी अधिक वाढवणारा टप्पा असतो. विरोधकांना संपवण्याच्या राजकारणापेक्षा स्वतःचा जनाधार मजबूत करण्यावर भर देणे अधिक महत्त्वाचे असते.
दुसरीकडे, या विजयामुळे संजयकाका पाटील यांनी तासगावच्या राजकारणात आपले अस्तित्व अजूनही भक्कम असल्याचे दाखवून दिले आहे. प्रतिकूल राजकीय परिस्थितीतही त्यांनी निवडणुकीच्या मैदानातून माघार घेतली नाही. उलट, थेट प्रतिस्पर्ध्याच्या घरात जाऊन विजय मिळवण्याची कामगिरी केली आहे.
एकवेळ शनिदेव सुटतील, पण संजयकाका सुटणार नाहीत, हा संजयकाकांचा इशारा आता जिल्हा बँकेच्या निकालानंतर पुन्हा चर्चेत आला आहे. राजकारणात कोणाला कायमचे संपवण्याच्या वल्गना करणाऱ्यांना मतदारांचा कौल काय असतो, याची जाणीव या निकालाने करून दिली आहे. आता तीन राजकीय धक्क्यांनंतर आमदार रोहित पाटील आपली रणनीती बदलणार का, कार्यकर्त्यांशी आणि मतदारांशी पुन्हा नव्याने संवाद साधणार का, की राजकीय संघर्षाची धार आणखी तीव्र करणार, याकडे संपूर्ण तासगाव तालुक्याचे लक्ष लागले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या