सांगली प्रतिनिधी : सामाजिक बांधिलकी जपत गेली तीन दशके विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणारे सांगलीतील सामाजिक कार्यकर्ते सुरेश गजानन सकटे यांना अमेरिकेच्या लुईझियाना संशोधन विद्यापीठाच्या वतीने मानद डॉक्टरेट प्रदान करून गौरविण्यात आले. व्यसनमुक्ती प्रचार व प्रसार, सामाजिक प्रबोधन, युवक कल्याण आणि महिला सबलीकरण या क्षेत्रांत त्यांनी केलेल्या भरीव कार्याची दखल घेऊन विद्यापीठाने त्यांना हा बहुमान बहाल केला. पुणे येथे नुकत्याच संपन्न झालेल्या कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. यावेळी संगीता सकटे आणि ऋचा सकटे उपस्थित होत्या.
सुरेश सकटे यांनी सामाजिक कार्याचा वसा केवळ स्वीकारला नाही, तर प्रत्यक्ष कृतीतून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले आहे. २००१ मध्ये गुजरातमध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपाच्या वेळी त्यांनी १०० युवकांच्या मदतीने भूकंपग्रस्त भागात सलग २१ दिवस श्रमदान करून मदतकार्य केले होते. तसेच सांगलीत २००५ आणि २०१९ मध्ये आलेल्या महापुराच्या काळात पूरग्रस्त सुमारे २०० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण मदत केली.
व्यसनमुक्ती, महिला सबलीकरण आणि युवक कल्याण या विषयांवर त्यांनी महाराष्ट्रभर आजवर दोन हजारांहून अधिक व्याख्याने दिली आहेत. व्यसनांच्या दुष्परिणामांविषयी जनजागृती, युवकांना विधायक कार्याची दिशा आणि महिलांना सक्षम बनविण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रबोधनाचे कार्य केले आहे. त्यांच्या या सामाजिक योगदानाची शासनस्तरावरही दखल घेतली गेली असून, विविध पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे.
सामाजिक कार्याबरोबरच साहित्य क्षेत्रातही सकटे यांनी आपला स्वतंत्र ठसा उमटविला आहे. गेली २६ वर्षे ते साहित्य क्षेत्रात कार्यरत असून, दरवर्षी साहित्य संमेलनांचे आयोजन करून नवोदित साहित्यिक, कवी आणि लेखकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम करतात. नुकतेच मुंबई येथे राष्ट्रीय लेखणी मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करून त्यांनी महाराष्ट्रातील कवींना आपली साहित्यप्रतिभा सादर करण्याची संधी उपलब्ध करून दिली.
सामाजिक परिवर्तनाची तळमळ, आपत्तीच्या काळातील मदतकार्य, व्यसनमुक्तीचे प्रबोधन आणि साहित्य चळवळीतील योगदान अशा विविधांगी कार्याची दखल घेत विद्यापीठाने त्यांना मानद डॉक्टरेट प्रदान केली आहे. भविष्यात सामाजिक कार्यासोबतच संशोधन क्षेत्रातही अधिक व्यापक योगदान देण्यासाठी हा सन्मान प्रेरणादायी ठरेल, अशी भावना व्यक्त होत आहे.
या गौरव सोहळ्यास भारतीय प्रशासकीय सेवेतील निवृत्त अधिकारी तुकाराम बागुल, निवृत्त न्यायाधीश शिवदास महाजन, डॉ. संभाजी सरकुंडे, अमोल देशमुख, सुनीता आघाडे, लक्ष्मीकांत गंभीरे, दत्तात्रय तपकिरे, रवींद्र येळवंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
सुरेश सकटे यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सांगलीसह विविध क्षेत्रांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या सामाजिक व साहित्यिक कार्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या