विजयपुर : शहरात भरदिवसा गोळीबार करून एका व्यक्तीची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शहरातील अफजलपूर टक्के परिसरातील रहिवासी यासीन जुबेर ( वय 35 ) हे आपल्या पत्नीसह स्कूटीवरून जात असताना अज्ञात हल्लेखोरांनी अचानक त्यांच्यावर गोळीबार केला. पत्नीसमोरच गोळ्या झाडून हल्लेखोरांनी यासीन यांची हत्या केली आणि घटनास्थळावरून पलायन केले. ही घटना आज सांयकाळी शहरातील मुंडेवाडी हाॅस्पीटल जवळ घडली असून गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या यासीन यांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर त्यांचा मृतदेह विजयपुरातील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला.
घटनास्थळी दोन गोळ्या आढळून आल्या असून, हल्लेखोरांनी दोन राऊंड फायरिंग केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षकांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. गांधी चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
या हत्येमागील नेमके कारण काय आणि हल्लेखोर कोण आहेत, याचा उलगडा पोलीस तपासातून होणार आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या