प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार व अजित पवार गटांच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर तासगाव-कवठे महांकाळचे आमदार रोहित आर. आर. पाटील यांच्या भूमिकेबाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्तावर त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे.आपल्या नावाने प्रसिद्ध झालेले संबंधित वृत्त चुकीचे असून,विलीनीकरण अथवा कोणत्याही प्रकारच्या पाठिंब्या बाबत आपण कोणतेही वक्तव्य केलेले नाही,असे आ.पाटील यांनी स्पष्ट केले.राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य एकत्रीकरणा बाबत सध्या राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर एका वृत्तवाहिनीच्या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या वृत्तात आ. रोहित पाटील यांच्या भूमिकेबाबत काही उल्लेख करण्यात आले होते.त्यात सत्तेत सहभागी होण्यास त्यांचा विरोध असल्याचे तसेच विलीनीकरणाबाबत पक्षाचा अंतिम निर्णय मान्य असेल,असे नमूद करण्यात आले होते.
या वृत्तानंतर आ.रोहित पाटील यांनी आपल्या अधिकृत ‘एक्स’ अकाउंटवरून भूमिका स्पष्ट केली. ‘विलीनीकरण अथवा पाठिंब्याबाबत मी कोणतेही वक्तव्य केलेले नाही.माझ्या नावाने येणाऱ्या बातम्यांबाबत मला कल्पना नाही.अद्याप पक्ष नेतृत्वाशी याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही,’ असे त्यांनी स्पष्ट केले.त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चेत आ. रोहित पाटील यांच्या नावाने प्रसिद्ध झालेल्या वृत्ताबाबत निर्माण झालेला संभ्रम दूर झाला आहे.या विषयावर पक्ष नेतृत्वाशी अद्याप चर्चा झालेली नसल्याने आपण कोणतीही अधिकृत भूमिका घेतलेली नसल्याचे त्यांच्या स्पष्टीकरणातून स्पष्ट झाले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या