सांगली प्रतिनिधी : पितृदिनाचे औचित्य साधत जायंट्स ग्रुप ऑफ सांगली पर्लच्या वतीने वृद्ध सेवा आश्रम, सांगली येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी आश्रमातील सर्व ज्येष्ठ पुरुषांचा पित्यासमान मान देत सत्कार करण्यात आला. त्यांना भेटवस्तू देऊन कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
कार्यक्रमादरम्यान ग्रुपच्या सदस्या शुभांगी दामले यांनी अन्नदानासाठी ग्रुपच्या वतीने वृद्धाश्रमास ५ हजार रुपयांची देणगी प्रदान केली. या मदतीबद्दल आश्रम प्रशासनाने त्यांचे आभार मानले.
यावेळी जायंट्स ग्रुपच्या सदस्यांनी आश्रमातील ज्येष्ठांशी मनमोकळ्या गप्पागोष्टी करत त्यांच्यासोबत वेळ घालवला. पितृदिनानिमित्त आपली आठवण ठेवून सदस्य आश्रमात आल्याने ज्येष्ठ नागरिकांनी आनंद व्यक्त केला. या भेटीमुळे वृद्धांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद दिसून आला.
सामाजिक बांधिलकी जपत ज्येष्ठांप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमाचे समन्वयन जया जोशी यांनी केले.
यावेळी अध्यक्षा रंजना साठे, सेक्रेटरी माधवी जोशी, माजी अध्यक्षा वैशाली कुलकर्णी, आशा पाटील, अक्षदा यादव, अनिता पवार, कांचन पाटील तसेच इतर सदस्य उपस्थित होत्या. सामाजिक संवेदनशीलतेचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या