प्रतिष्ठा न्यूज / किरण कुंभार
तासगाव : सध्याच्या काळात पैशांसाठी अनेकदा माणुसकी आणि नैतिक मूल्ये बाजूला सारली जात असताना, चुकून बँक खात्यावर जमा झालेल्या पैशांचा कोणताही मोह न बाळगता संबंधितांना संपूर्ण रक्कम परत करण्याचा प्रामाणिकपणा शिवसेनेचे तासगाव तालुका उपप्रमुख सर्जेराव पाटील यांनी दाखविला आहे. दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये तब्बल ५८ हजार रुपये संबंधित व्यक्तींना परत करून त्यांनी प्रामाणिकपणाचा आदर्श समाजासमोर ठेवला आहे.दि. २ नोव्हेंबर रोजी कवठे एकंद येथील अक्षय प्रदीप पाटील यांचे ५० हजार रुपये चुकून सर्जेराव पाटील यांच्या बँक खात्यावर जमा झाले होते. याबाबत अक्षय पाटील यांनी सर्जेराव पाटील यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी तत्काळ कोणताही विलंब न करता संपूर्ण ५० हजार रुपयांची रक्कम परत केली.यापूर्वी दि.७ ऑक्टोबर रोजी राजेंद्र ज्योतीराम अष्टेकर यांचेही आठ हजार रुपये चुकून सर्जेराव पाटील यांच्या खात्यावर जमा झाले होते. संबंधित व्यक्तीशी संपर्क साधून त्यांनी ही रक्कमही प्रामाणिकपणे परत केली होती.विशेष म्हणजे,दोन्ही घटनांमध्ये एकूण ५८ हजार रुपयांची रक्कम परत करताना त्यांनी कोणतीही अपेक्षा ठेवली नाही.आर्थिक व्यवहारांमध्ये विश्वासार्हता, पारदर्शकता आणि प्रामाणिकपणा किती महत्त्वाचा असतो, हे सर्जेराव पाटील यांच्या कृतीतून अधोरेखित झाले आहे.राजकारण आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असताना केवळ पदापेक्षा आचरणातून स्वतःची ओळख निर्माण करणे महत्त्वाचे असते. सर्जेराव पाटील यांनी दाखविलेल्या या प्रामाणिकपणाचे तासगाव तालुक्यातून कौतुक होत असून, त्यांच्या या कृतीची सर्वत्र चर्चा सुरू आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या