प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : येथील शहीद अशोक कामटे क्रीडा नगरी, पोलीस मुख्यालय मैदान, विश्रामबाग येथे सुरू असलेल्या ५२ व्या कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा २०२६ चा चौथा दिवस मोठ्या उत्साहात पार पडला. या स्पर्धेत कोल्हापूर परिक्षेत्रातील सहा पोलीस घटकांमधील एकूण १,१५० खेळाडूंनी सहभाग घेतला असून, विविध क्रीडा प्रकारांमध्ये खेळाडूंनी आपले कौशल्य, शारीरिक क्षमता आणि जिद्दीचे दर्शन घडविले.
चौथ्या दिवशी वैयक्तिक अॅथलेटिक्स स्पर्धांमध्ये विविध गटांत चुरशीच्या लढती पाहायला मिळाल्या. पुरुष व महिला गटातील पॉवरलिफ्टिंगच्या विविध वजनी गटांतील स्पर्धांसह धावणे, अडथळा शर्यत, ट्रिपल जंप आणि भालाफेक या प्रकारांमध्ये खेळाडूंनी दमदार कामगिरी केली.
ॲथलेटिक्समध्ये सातारा, पुणे ग्रामीणच्या खेळाडूंची बाजी
पाच हजार मीटर धावण्याच्या पुरुष गटात सातारा येथील हर्षवर्धन दबडे यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर महिला गटात पुणे ग्रामीणच्या ऋतुजा कांबळे यांनी बाजी मारली. महिला गटातील १०० मीटर अडथळा शर्यतीत साताऱ्याच्या वैष्णवी शिंदे यांनी विजेतेपद मिळविले. पुरुष गटातील ट्रिपल जंपमध्ये साताऱ्याचे सी. एस. मर्डे यांनी उत्कृष्ट कामगिरी करत विजय मिळविला.
पुरुष गटातील ११० मीटर अडथळा शर्यतीत पुणे ग्रामीणच्या विशाल शिंदे यांनी अव्वल स्थान मिळविले. भालाफेक महिला गटात सोलापूर ग्रामीणच्या रेखा नायकवाडे, तर पुरुष गटात पुणे ग्रामीणच्या अंकित पवार यांनी विजेतेपद पटकावले. या यशामुळे संबंधित पोलीस घटकांच्या खेळाडूंच्या कामगिरीची विशेष दखल घेण्यात आली.
सांघिक स्पर्धांमध्येही चुरस
वैयक्तिक स्पर्धांबरोबरच सांघिक खेळांमध्येही रंगतदार सामने पाहायला मिळाले. सांघिक स्पर्धा साखळी पद्धतीने आयोजित करण्यात आल्या असून, चौथ्या दिवशी पुरुष व महिला गटातील विविध खेळांच्या उपांत्य फेरीतील सामने पार पडले. महिला कबड्डीच्या अंतिम सामन्यात पुणे ग्रामीण संघाने विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले.
या स्पर्धांच्या माध्यमातून पोलीस दलातील अधिकारी व अंमलदारांना आपले क्रीडागुण दाखविण्याची संधी मिळत असून, खेळाडूंमध्ये शिस्त, संघभावना, खिलाडूवृत्ती आणि शारीरिक तंदुरुस्तीला प्रोत्साहन मिळत आहे.
२९ ऑक्टोबरला समारोप व बक्षीस वितरण
या क्रीडा स्पर्धेचा समारोप व बक्षीस वितरण समारंभ गुरुवार, दि. २९ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजल्यानंतर शहीद अशोक कामटे क्रीडा नगरी, पोलीस मुख्यालय मैदान, विश्रामबाग, सांगली येथे होणार आहे.
या कार्यक्रमाला आंतरराष्ट्रीय खेळाडू श्रीमती तेजस्विनी सावंत प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र, कोल्हापूर येथील श्री. रंजन कुमार शर्मा हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. तसेच सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त श्री. एम. राजकुमार, कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक श्री. निलोत्पल, साताऱ्याचे पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे, सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी आणि पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री. संदीपसिंग गिल्ल यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
नागरिकांनी उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे
स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंचा गौरव आणि बक्षीस वितरण सोहळा नागरिकांनाही प्रत्यक्ष पाहता येणार आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पोलीस खेळाडूंचा उत्साह वाढवावा, असे आवाहन सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. तुषार दोशी यांनी केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या