सांगली, प्रतिनिधी : साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे जयंती महोत्सव समिती, सांगली जिल्हाची सन २०२६-२७ या वर्षासाठीची नूतन कार्यकारिणी रविवारी सत्यशोधक हॉल, सांगली येथे झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बिनविरोध निवडण्यात आली. यावेळी समितीत अण्णा भाऊ साठे यांच्या स्नुषा सावित्रीमाई साठे आणि वारसदार (नातू) सचिनभाऊ साठे यांची कायमस्वरूपी विशेष निमंत्रित सदस्य म्हणून अभिनंदनीय निवड करण्यात आली. तसेच समितीने संपूर्ण वर्ष "शाश्वत मानवतावादी वर्ष २०२६-२७" म्हणून साजरे करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी दलितमित्र समाजभूषण अशोक पवार होते. या बैठकीस मातंग समाजासह बहुजन समाजातील नेते, कार्यकर्ते, साहित्यिक, कलावंत, अभ्यासक, प्राध्यापक, उद्योजक आणि विविध सामाजिक चळवळीतील शंभरहून अधिक मान्यवर उपस्थित होते. आगामी १०६ वी अण्णा भाऊ साठे जयंती सर्वसमावेशक आणि व्यापक स्वरूपात साजरी करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
बैठकीच्या प्रारंभी समितीचे माजी अध्यक्ष उत्तम मोहिते यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. माजी नगरसेविका शेवंताताई वाघमारे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. गॅब्रिएल तिवडे यांनी प्रास्ताविक करून निवड प्रक्रियेची माहिती दिली. अध्यक्षपदासाठी सुरुवातीला सात जण इच्छुक होते. मात्र, सामंजस्याची भूमिका स्वीकारत काहींनी माघार घेतल्यानंतर सर्वानुमते सतीश मोहिते यांची अध्यक्ष, शेखर मोहिते यांची कार्याध्यक्ष आणि जितेंद्र वायदंडे यांची उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात या निवडीचे स्वागत केले.
यावेळी वर्षभर सामाजिक समता, मानवता, शाश्वत विकास आणि अण्णा भाऊ साठे यांच्या विचारांचा प्रसार करणारे विविध उपक्रम राबविण्याचा निर्धार करण्यात आला. अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून मार्गदर्शन केले. दादासाहेब कस्तुरे यांनी प्रेरणादायी गीते सादर करून वातावरण भारावून टाकले. आकाश तिवडे यांनी आभार प्रदर्शन केले.
वीस सदस्यीय सल्लागार समिती गठीत
समितीने ज्येष्ठ अभ्यासक, विचारवंत व कार्यकर्त्यांचा समावेश असलेली २० सदस्यीय सल्लागार समिती गठीत केली असून कुलदीप देवकुळे यांची प्रमुख सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली. समितीत सुरेश दूधगावकर, आसिफभाई बावा, अशोक पवार, किरणराज कांबळे, शेवंताताई वाघमारे, संभाजी केंचे, सॅमसंग तिवडे, सचिन आवळे, संजय कांबळे, प्रा. रवींद्र ढाले, डॉ. नितीन गोंधळे, संजय मोरे, गॅब्रिएल तिवडे, रंधवा गायकवाड, महेंद्र करुणासागर, नंदकुमार घाटगे, सचिन केंचे आणि आकाश तिवडे यांचा समावेश आहे.
बैठकीस वनिताताई सकटे, प्रमोद रास्ते, कपिल आवळे, श्रीकांत साठे, राजू चव्हाण, हेमंत मोहिते, आतांबर शिराढोणकर, पास्टर यशया तालुरी, सलीम शेख, ज्ञानेश्वर केंगार, विक्रम मोहिते, सूर्यकांत लोंढे, लखन वारे, विनोद तांदळे, महेश सकटे, विनायक हेगडे, पोपट मोरे, झाकीरभाई नदाफ, चेतक ऊर्फ नानाभाई कांबळे, विशाल घाटगे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या