प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला आज सात दिवस पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या समर्थनार्थ तासगावातील सकल मराठा समाज आक्रमकपणे रस्त्यावर उतरला.शहरातील एसटी स्टँड चौकात सकल मराठा समाजाच्या वतीने तब्बल एक तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यामुळे सांगली-विटा मार्गासह बसस्थानक परिसरातील वाहतूक सुमारे तासभर ठप्प झाली.सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळावे, या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला तासगावकरांनी जोरदार पाठिंबा दर्शविला. यावेळी आंदोलकांनी सरकारकडे सगेसोयरे अधिसूचनेचे तातडीने कायद्यात रूपांतर करून सरसकट कुणबी प्रमाणपत्र वाटप सुरू करावे, अशी प्रमुख मागणी केली. तसेच मराठा समाजाच्या इतर प्रलंबित मागण्यांकडेही सरकारचे लक्ष वेधण्यात आले.मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावत चालली असून सरकारने या गंभीर परिस्थितीची तातडीने दखल घेऊन मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणी आंदोलकांनी केली. सरकारने मागण्यांबाबत ठोस निर्णय घेतला नाही, तर आगामी काळात मराठा समाज अधिक मोठ्या संख्येने आणि ताकदीने रस्त्यावर उतरेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.रास्ता रोको आंदोलनामुळे सांगली-विटा मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.बसस्थानक परिसरातील वाहतुकीवरही त्याचा परिणाम झाला.दरम्यान,कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी घटनास्थळी चोख बंदोबस्त ठेवला होता.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या