आरग : ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेऊनही जिद्द, बुद्धिमत्ता आणि कल्पकतेच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावर यशाची मोहर उमटवता येते, हे सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा लक्ष्मीवाडी (आरग) येथील विद्यार्थी राजवर्धन प्रदीप काळे याने सिद्ध केले आहे. बाराव्या राष्ट्रीय स्तरावरील ‘इन्स्पायर मानक स्पर्धा २०२६-२७’मध्ये देशातील अंतिम ६० विद्यार्थ्यांमध्ये स्थान मिळवत राजवर्धनने शाळेचा नावलौकिक वाढवला आहे. त्याच्या या उल्लेखनीय यशामुळे संपूर्ण परिसरातून त्याचे कौतुक होत आहे.
या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील ३५ विद्यार्थ्यांची निवड झाली होती. त्यापैकी अवघ्या सात विद्यार्थ्यांनी देशातील अंतिम ६० विद्यार्थ्यांमध्ये स्थान मिळवले. या गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये राजवर्धन काळे याचा समावेश झाला आहे. ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत राष्ट्रीय स्तरावर मजल मारण्याची त्याची कामगिरी विशेष कौतुकास्पद ठरली आहे.
राजधानी दिल्लीत विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते राजवर्धनने राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारला. या यशामुळे त्याला जपान येथे वैज्ञानिक अभ्यास दौऱ्यावर जाण्याची संधी मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या दौऱ्याच्या माध्यमातून त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावरील वैज्ञानिक प्रगती, संशोधन आणि तंत्रज्ञानाचा जवळून अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे.
राजवर्धनच्या या यशामागे त्याचे पालक प्रदीप काळे सर, विज्ञान शिक्षक सुनील गावडे सर आणि शाळेचे मुख्याध्यापक रंगराव पाटील सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टिकोन, जिज्ञासा आणि सर्जनशीलतेला योग्य दिशा व प्रोत्साहन मिळाल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थीही राष्ट्रीय स्तरावर चमकू शकतात, याची प्रचिती राजवर्धनच्या यशातून आली आहे.
राजवर्धनच्या या दैदीप्यमान यशाबद्दल त्याचे पालक, मार्गदर्शक शिक्षक, मुख्याध्यापक आणि जिल्हा परिषद शाळा लक्ष्मीवाडी (आरग) यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. त्याच्या यशाने शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेचा गौरव झाला असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी तो प्रेरणादायी आदर्श ठरला आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या