प्रतिष्ठा न्यूज /अनिल शिंदे
सावळज : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोजदादा जरांगे पाटील यांच्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर खुजगाव ता. तासगाव येथे मराठा समाजाची आढावा बैठक उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. बैठकीस गावातील समाजबांधवांनी गट-तट व राजकीय मतभेद बाजूला ठेवत मोठ्या संख्येने उपस्थित राहून समाज एकजुटीचे दर्शन घडविले.
बैठकीत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे समन्वयक मा. विशाल पाटील यांनी महामंडळाच्या कामकाजाची माहिती देताना, शासनाकडून व्याज परतावा देण्यास होत असलेल्या विलंबाबाबत नाराजी व्यक्त केली.
मराठा क्रांती मोर्चाचे सांगली जिल्हा समन्वयक मा. डॉ. संजय पाटील यांनी मराठा आरक्षणाची आवश्यकता स्पष्ट करताना, औंध, सातारा व कोल्हापूर गॅझेट लागू झाल्याशिवाय व मराठा हाच कुनबी व कुनबी हाच मराठा हे परिपत्रक निघाले शिवाय पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाला न्याय मिळणार नसल्याचे सांगितले. समाजाने संघटित राहून आरक्षणाच्या लढ्याला अधिक बळ देण्याचे आवाहनही त्यांनी केले
यावेळी उपस्थित समाजबांधवांनी, जनतेने निवडून दिलेले खासदार व आमदार यांनी दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत, तर त्यांना परत बोलावण्याचा (राइट टू रिकॉल) अधिकार मतदारांना मिळावा, अशी मागणी केली.
बैठकीत मा. मनोजदादा जरांगे पाटील यांच्या कवठेमहांकाळ येथील सभेला गावातून मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. तसेच बस्तवडे फाटा येथे गावाच्या वतीने मा. मनोजदादा यांचा जाहीर सत्कार करण्याचे नियोजन निश्चित करण्यात आले.
बैठकीस गावातील ज्येष्ठ नागरिक, युवक तसेच मराठा समाजातील विविध स्तरांतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या