प्रतिष्ठा न्यूज | किरण कुंभार
तासगाव :सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत तासगाव सोसायटी गटात शंभर टक्के मतदान झाले असून, सर्वच्या सर्व ७९ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.अंजनी विरुद्ध चिंचणी अशा रंगलेल्या या प्रतिष्ठेच्या लढतीत एकही मतदार मतदानापासून दूर राहिला नसल्याने निवडणुकीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.आता या लढतीचा निकाल दि. ३ नोव्हेंबर रोजी सांगली येथे जाहीर होणार असून, संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष तासगावच्या निकालाकडे लागले आहे.दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी, असा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निरोप असल्याची राजकीय चर्चा होती.मात्र,काही मतदारसंघांमध्ये बिनविरोध निवडीचे प्रयत्न यशस्वी झाले, तर तासगाव, कवठेमहांकाळ, जत आणि मिरज तालुक्यांमध्ये निवडणुकीचे रणांगण तापले. त्यामुळे जिल्हा बँकेची निवडणूक केवळ सहकार क्षेत्रापुरती मर्यादित न राहता राजकीय प्रतिष्ठेची बनली आहे.
७९ मतदार; एकही मतदार मतदानापासून दूर नाही!
तासगाव तालुक्यातील सोसायटी गटात सुरुवातीपासूनच अटीतटीचे वातावरण होते.अवघ्या ७९ मतदारांचा हा मतदारसंघ असल्याने प्रत्येक मताला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते.प्रचाराच्या काळात दोन्ही बाजूंच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मतदारांच्या वैयक्तिक गाठीभेटींवर भर दिला होता.कोणत्याही परिस्थितीत आपले पारडे जड करण्यासाठी दोन्ही गटांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली.रविवारी झालेल्या मतदान प्रक्रियेत सर्व ७९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.त्यामुळे शंभर टक्के मतदानाची नोंद झाली. मतदारांनी दाखविलेल्या या उत्स्फूर्त सहभागामुळे दोन्ही बाजूंच्या विजयाच्या अपेक्षा वाढल्या आहेत.मात्र,मतदारांनी नेमका कोणाला कौल दिला, याचा अंदाज बांधणे सध्या कठीण झाले आहे.
आर.आर.आबांच्या आठवणींचीही परीक्षा!
या निवडणुकीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील अर्थात आबांच्या राजकीय वारशाची लागलेली कसोटी.तासगाव तालुक्यातील अनेक सोसायटी मतदार हे आबांचे जुने समर्थक आणि चाहते म्हणून ओळखले जातात. आबांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी सहकार क्षेत्रातील या मतदारांना विश्वासात घेतले, त्यांना मान-सन्मान दिला आणि राजकीय प्रक्रियेत सहभागी करून घेतले.
आबांच्या निधनानंतर तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलली.काही कार्यकर्त्यांनी नव्या नेतृत्वाशी जुळवून घेतले, तर काहींची राजकीय वाटचाल वेगळ्या दिशेने सुरू झाली. असे असले तरी आबांविषयी असलेला जिव्हाळा आणि आदर आजही अनेकांच्या मनात कायम आहे. त्यामुळे या निवडणुकीत जुन्या राजकीय नात्यांचा प्रभाव कितपत राहिला, याची उत्सुकता आहे.
आबांनी निर्माण केलेल्या विश्वासाच्या राजकारणाला मतदार किती महत्त्व देतात आणि बदललेल्या राजकीय परिस्थितीत त्यांची भूमिका काय राहते, हे निकालातून स्पष्ट होणार आहे.
अंजनी विरुद्ध चिंचणी : नेत्यांची प्रतिष्ठा पणाला!
तासगाव सोसायटी गटातील ही लढत अंजनी विरुद्ध चिंचणी अशी रंगली.एका बाजूला माजी आमदार सुमनताई (वहिनी) आर.आर.पाटील आणि आमदार रोहित पाटील यांनी निवडणुकीची जबाबदारी स्वीकारत मतदारांशी संपर्क साधला. सुरेशभाऊ पाटील यांनीही मतदारांच्या गाठीभेटी घेत आपली बाजू मजबूत करण्याचा प्रयत्न केला.दुसरीकडे माजी खासदार संजयकाका पाटील यांनी आपल्या निष्ठावान कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याची रणनीती आखली.प्रत्येक मतदाराशी वैयक्तिक संपर्क, जुने राजकीय संबंध, स्थानिक पातळीवरील समीकरणे आणि मतदारांची नाराजी दूर करण्यावर दोन्ही बाजूंनी भर दिला.अवघ्या ७९ मतदारांचा गट असल्याने येथे मोठ्या सभा किंवा शक्तिप्रदर्शनापेक्षा वैयक्तिक संपर्क आणि राजकीय विश्वासाला अधिक महत्त्व होते. त्यामुळे ही निवडणूक दोन्ही बाजूंच्या नेत्यांसाठी प्रतिष्ठेची बनली.
मतदारांची सावध भूमिका; विजयाचे गणित गुलदस्त्यात!
प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत अनेक मतदारांनी आपली भूमिका स्पष्ट केली नव्हती. दोन्ही बाजूंच्या नेत्यांशी आणि कार्यकर्त्यांशी संपर्क ठेवत मतदारांनी सावध भूमिका घेतली.काहींचे वैयक्तिक संबंध एका बाजूला, तर राजकीय समीकरणे दुसऱ्या बाजूला असल्याने अंतिम कौल कोणाच्या बाजूने जाईल, याबाबत संभ्रम कायम होता.आता शंभर टक्के मतदान झाल्यानंतर दोन्ही बाजूंकडून विजयाचे दावे केले जाण्याची शक्यता आहे. मात्र, प्रत्यक्ष मतमोजणी होईपर्यंत कोणाचे पारडे जड आहे, हे निश्चितपणे सांगता येणार नाही. एखाद्या-दोन मतांचा फरकही निकालाचे चित्र बदलू शकतो, अशी परिस्थिती असल्याने प्रत्येक मताचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.
३ नोव्हेंबरला राजकीय चित्र स्पष्ट होणार!
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ही निवडणूक सहकार क्षेत्रातील प्रतिनिधित्वाबरोबरच जिल्ह्यातील राजकीय नेत्यांच्या प्रतिष्ठेचीही परीक्षा पाहणारी ठरली आहे. विशेषतः तासगाव सोसायटी गटातील निकालातून स्थानिक नेतृत्वाची ताकद, कार्यकर्त्यांची निष्ठा, जुन्या राजकीय संबंधांचा प्रभाव आणि बदलत्या राजकीय समीकरणांचे प्रतिबिंब उमटण्याची शक्यता आहे.
सर्व ७९ मतदारांनी मतदान केल्याने आता मतपेटीत बंद झालेल्या कौलाची उत्सुकता वाढली आहे. अंजनीचा राजकीय प्रभाव कायम राहणार की चिंचणी बाजी मारणार? आर. आर. आबांच्या जुन्या राजकीय नात्यांना मतदारांनी पसंती दिली की बदललेल्या समीकरणांना साथ दिली? या प्रश्नांची उत्तरे दि. ३ नोव्हेंबर रोजी सांगली येथे होणाऱ्या मतमोजणीनंतर मिळणार आहेत.शंभर टक्के मतदानाने तासगाव सोसायटी गटातील लढतीचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून, आता संपूर्ण जिल्ह्याला निकालाची प्रतीक्षा लागली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या