सांगली प्रतिनिधी: अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या सांगली शाखेच्या वतीने दरवर्षी दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांची घोषणा अध्यक्ष प्राचार्य डॉ. भास्कर ताम्हनकर यांनी केली आहे. संचालक मंडळाच्या बैठकीत या पुरस्कारांची एकमताने निवड करण्यात आली. पुरस्कारांचे हे दहावे वर्ष आहे.
यावर्षीचे पुरस्कार पुढीलप्रमाणे :
१. काकासाहेब खाडिलकर जीवनगौरव पुरस्कार - श्री. विवेक देशपांडे
शालेय वयापासून अभिनयाची आवड असलेल्या विवेक देशपांडे यांनी चित्रा पालेकर, अमोल पालेकर, सतीश तारे, जयदेव हट्टंगडी, प्रतिभा मतकरी, नाना पाटेकर अशा मान्यवर कलाकारांसह रंगभूमीवर काम केले आहे. 'अँटिगनी' या १९७६ साली त्यांनी केलेल्या पहिल्या प्रयोगाला यावर्षी ५० वर्षे पूर्ण होत आहेत. १९८३ पासून ते सांगलीच्या नाट्यक्षेत्रात सक्रिय असून सुमारे ३५ नाटकांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका केल्या आहेत. राज्य नाट्य स्पर्धेत अभिनयाची अनेक पारितोषिके त्यांना मिळाली आहेत. ते नाट्य परिषदेच्या सांगली शाखेचे माजी कार्यवाह असून अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समिती (भावे नाट्य मंदिर) चे सध्या संचालक आहेत.
*२. आचार्य अत्रे प्रतिभारंग पुरस्कार - श्री. मंगेश मंत्री*
ज्येष्ठ पत्रकार आणि 'तरुण भारत' सांगली आवृत्तीचे निवृत्त वृत्त विभाग प्रमुख. साहित्य संमेलन, नाट्य संमेलनांचे प्रभावी वृत्तांकन, ग्रंथ निर्मिती, कथासंग्रह, मान्यवरांवरील लेख, अग्रलेख, लॉकडाऊन सारखा काव्यसंग्रह, कथाकथन, गीत निर्मिती तसेच आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या कार्यक्रमांमध्ये त्यांचा लक्षणीय सहभाग आहे.
*३. दिलीप परदेशी नाट्यरंग पुरस्कार - श्री. वरुण जाधव*
तरुण लेखक, अभिनेते आणि दिग्दर्शक. आतापर्यंत ७ नाटके, १८ एकांकिका, ८ लघुनाटिका आणि ३ पथनाट्यांचे लेखन. नाटक , एकांकिका,संगीत नाटक, दूरचित्रवाणी मालिका, चित्रपट यामध्ये विशेष योगदान.
*४. अरुण पाटील नाट्यतंत्र पुरस्कार - श्री. सुनील पाटील*
महाविद्यालयीन जीवनापासून नाट्यक्षेत्रात कार्यरत. बेबी, सरहद्द, चाहूल, पुरुषार्थ, हॅलो अंजू, या सारखी प्रायोगिक नाटके आणि एकांकिका.फुल टॉस,पिलर ऑफ डेमोक्रसी, ज्योती म्हणे, गण्याची शाळा सुटली, पाटी फुटली अशा व्यावसायिक नाटकांची प्रकाश योजना त्यांनी केली आहे.सध्या 'आपलं एफएम' रेडिओ वाहिनीवर असिस्टंट कन्टेन्ट मॅनेजर.
*५. नाना ताडे नाट्यस्वर पुरस्कार - सौ. स्वरदा खाडिलकर*
संगीत अलंकार पर्यंत प्रशिक्षण. कै. वसंतराव गुरव, कै. रत्नाकर दिवाकर, आणि ऋषिकेश बोडस यांच्याकडे शास्त्रीय व नाट्य संगीताचे शिक्षण. सध्या संगीत अध्यापक म्हणून कार्यरत.
*६. विशेष सन्मान - सांगली शिक्षण संस्था, सांगली*
गेली १५ वर्षे बालनाट्य शिबिरे, बालनाट्य स्पर्धांचे आयोजन आणि राज्य नाट्य स्पर्धेत सातत्यपूर्ण सहभाग याबद्दल.
*७. श्रीनिवास शिंदगी बालरंगभूमी पुरस्कार - श्री. प्रीतम जोशी*
जवळपास २० बालनाट्यांचे लेखन, राज्यस्तरावर अभिनय, दिग्दर्शन, लेखनाची १३ पारितोषिके. संस्कृत व मराठी नाट्यलेखन. २० वर्षांहून अधिक काळ बाल-कुमार अभिनय प्रशिक्षण शिबिरांमध्ये कार्य.
*८. डॉ. मधुकर आपटे कलावंत पुरस्कार राज्य नाट्य स्पर्धेत रौप्यपदक मिळालेल्या कलाकारांना हा पुरस्कार दिला जातो.*
*अ) इरफान मुजावर* - 'युटोपिया' नाटकासाठी राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत अभिनयाचे रौप्य पदक. या नाटकाचे लेखन-दिग्दर्शनही त्यांचेच.
*ब) हर्षाली बेलवलकर* - 'युटोपिया'नाटकातील भूमिकेसाठी अभिनयाचे रौप्य पदक.
*क) प्रताप सोनाळे* - ''ती'च्या संदर्भातील गोष्ट ' या नाटकाच्या प्राथमिक फेरीतील प्रयोगासाठी अभिनयाचे रौप्य पदक.
*पुरस्कार वितरण सोहळा:*
दिनांक ४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता, संजय भोकरे इन्स्टिट्यूट ऑफ फिल्म, मीडिया अँड आर्ट्सच्या सभागृहात, चितळे डेअरी भिलवडीचे संचालक आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे आजीव सदस्य श्री. गिरीश चितळे यांच्या हस्ते होणार आहे.नाट्यपरिषदेचे सभासद आणि नाट्य प्रेमींनी या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या