सांगली, दि.३ : गेली चार दशके सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेल्या नाट्य, चित्रपट, कलाकार, तंत्रज्ञ कल्याण ट्रस्ट आणि युवा शक्ती व्यसनमुक्ती व एड्स प्रतिबंधक संस्कार केंद्र, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार, दि. ५ नोव्हेंबर रोजी रंगभूमी दिनानिमित्त ‘युवा कला विजय पुरस्कार’ वितरण सोहळा व कलाकार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष विजयदादा कडणे यांनी दिली.
सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या युवा कलाकारांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळावे, त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव व्हावा आणि त्यांच्या पुढील कलाप्रवासाला प्रेरणा मिळावी, या उद्देशाने यावर्षीपासून ‘कला विजय पुरस्कार’ प्रदान करण्याचा उपक्रम सुरू करण्यात येत आहे.
यंदाच्या वर्षी डॉ. अनुराधा साळुंखे, स्मिता भाटकर, मयुरेश पाटील, वैष्णवी जाधव आणि चेतन सूर्यवंशी यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असून, मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
हा कार्यक्रम गुरुवार, दि. ५ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता दैवज्ञ भवन, सांगली येथे संपन्न होणार आहे. या सोहळ्यास सांगली जिल्ह्यातील तसेच परिसरातील कलाकार, नाट्यकर्मी, चित्रपट क्षेत्रातील तंत्रज्ञ आणि रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ट्रस्टचे सचिव राजेंद्र पोळ यांनी केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या