सांगली प्रतिनिधी : देशात आणि राज्यात घडणाऱ्या महत्त्वाच्या घटनांवर, जनतेच्या प्रश्नांवर तसेच लोकशाहीसमोरील आव्हानांवर केवळ सोशल मीडियावर चर्चा करून थांबू नका. चौकात, रस्त्यावर, कट्ट्यावर आणि जिथे नागरिक एकत्र येतात, तिथे बिनधास्तपणे बोला. महाविद्यालयीन विद्यार्थी, तरुण-तरुणी, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांनी आपली मते उघडपणे मांडावीत. नागरिकांच्या प्रश्नांवर चर्चा घडवून आणण्यासाठी आपण पुढाकार घेणार आहोत, असे आवाहन माजी केंद्रीय मंत्री व माजी खासदार प्रतिक पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले.
पाटील म्हणाले, आज देशात अनेक ज्वलंत प्रश्न निर्माण झाले आहेत. विविध विषयांवर आंदोलने होत आहेत. महामार्गांच्या कामांमधील चुकीच्या बाबी, घटनात्मक मूल्यांवरील आघात, विद्यार्थ्यांची आंदोलने आणि तरुण पिढीसमोरील प्रश्न यांवर समाजात खुली चर्चा होणे आवश्यक आहे. दिल्लीत घडणाऱ्या घटनांची तीव्रता मोठी आहे. मात्र, या विषयांवर सोशल मीडियापुरती चर्चा मर्यादित राहू नये. नागरिकांनी एकत्र येऊन प्रश्न समजून घ्यावेत, आपली भूमिका मांडावी आणि संबंधितांना जाब विचारावा.
आंदोलन करणाऱ्या तरुणांना पाठिंबा देण्याची गरज
तरुण आपल्या भवितव्यासाठी आणि जनतेच्या प्रश्नांसाठी संघर्ष करत रस्त्यावर उतरून आंदोलने करीत आहेत. अशा आंदोलकांना पाठिंबा देण्याऐवजी त्यांच्यावर वेगवेगळी लेबले लावली जात असतील, तर हा चिंतेचा विषय आहे. आंदोलन कोणासाठी आहे, त्यामागील प्रश्न काय आहेत आणि त्यातून कोणत्या मागण्या मांडल्या जात आहेत, हे समजून घेतले पाहिजे. ही आंदोलने जनतेच्या हितासाठी आणि तरुण पिढीच्या भवितव्यासाठी असतील, तर त्यांना योग्य पाठिंबा मिळाला पाहिजे, अशी भूमिका प्रतिक पाटील यांनी मांडली.
विद्यार्थी आणि आंदोलकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होऊ नये. त्यांच्या प्रश्नांवर चर्चा झाली पाहिजे. विशेषतः महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी, युवकांनी आणि युवतींनी सामाजिक प्रश्नांबाबत जागरूक राहून आपली भूमिका निर्भयपणे मांडावी. नागरिकांच्या अडचणी वाढतील, सामान्य जनजीवन विस्कळीत होईल, अशा पद्धतीने आंदोलन करण्याऐवजी लोकशाही मार्गाने संवाद आणि चर्चेचे व्यासपीठ निर्माण करण्यावर भर दिला पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
भाजप किंवा कोणत्याही पक्षाच्या विरोधात नाही
मी भाजपच्या विरोधात नाही किंवा कोणत्याही राजकीय पक्षाच्या विरोधात नाही. मी सध्या राजकारणात सक्रिय नाही तसेच कोणत्याही पक्षाच्या पदावरही नाही. मात्र, देशात घडणाऱ्या महत्त्वाच्या घटनांवर आणि जनतेच्या ज्वलंत प्रश्नांवर आवाज उठविणे ही माझी जबाबदारी आहे, असे प्रतिक पाटील यांनी सांगितले.
पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन नागरिकांच्या प्रश्नांवर चर्चा होणे गरजेचे आहे. सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते, अधिकारी आणि विविध क्षेत्रांतील जबाबदार व्यक्तींनाही नागरिकांनी प्रश्न विचारले पाहिजेत. देशात आणि समाजात जे काही घडत आहे, ते योग्य दिशेने सुरू आहे का, याबाबत प्रत्येकाने स्वतः विचार करावा. प्रसारमाध्यमे आणि प्रशासनासारख्या जबाबदार घटकांनीही लोकशाहीतील सकारात्मक संवादाला पाठिंबा द्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
नागरिकांनी मतदानाच्या हक्काबाबतही जागरूक राहावे
आपल्या दैनंदिन जीवनात अनेक प्रश्न असतात. महागाई, रोजगार, शिक्षण, सार्वजनिक सुविधा आणि नागरिकांचे अधिकार अशा विषयांवर प्रत्येकाने बोलले पाहिजे. आपला मतदानाचा हक्क आणि लोकशाहीतील सहभाग अबाधित राहील का, याबाबतही नागरिकांनी सजग राहणे आवश्यक आहे. लोकांनी प्रश्न समजून घेतले, त्यावर उघडपणे चर्चा केली आणि आपली मते निर्भयपणे मांडण्यास सुरुवात केली, तर सरकारलाही जनतेच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे लागेल. लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासनाला योग्य पावले उचलावी लागतील, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.
जनतेने डावलले, तरी सामाजिक प्रश्नांवरील काम सुरूच
आपल्या राजकीय आणि सामाजिक प्रवासाचा उल्लेख करताना प्रतिक पाटील म्हणाले की, मी मोठ्या प्रमाणावर कामे करूनही जनतेने मला डावलले, याची खंत होती. मात्र, त्यामुळे काम थांबविलेले नाही. विविध विषयांवर आपला पाठपुरावा सुरू आहे. सांगलीतील खोकीधारकांच्या पुनर्वसनाचा प्रश्नही आपण हाताळत असून, त्यासंदर्भात पाठपुरावा सुरू आहे. ही खोकी कायदेशीर आहेत का, त्यांच्याबाबतचे नियम काय आहेत आणि संबंधित नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न कसा सोडविता येईल, यावर स्पष्टता येणे आवश्यक आहे, असे त्यांनी नमूद केले.
‘बोल बिनधास्त’ अभियानातून जनतेला व्यासपीठ
जनतेच्या प्रश्नांवर मोकळेपणाने चर्चा व्हावी, नागरिकांनी आपले अनुभव मांडावेत आणि समाजातील महत्त्वाच्या विषयांवर लोकांचे मत पुढे यावे, या उद्देशाने ‘बोल बिनधास्त’ हा उपक्रम पुढे नेण्यात येणार आहे. नागरिकांनी केवळ पोस्ट आणि कमेंटपुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष भेटीतही प्रश्नांवर चर्चा करावी. सोशल मीडियावर आपली मते मांडताना #बोलबिनधास्त हा हॅशटॅग वापरून चर्चा शेअर करावी, असे आवाहन प्रतिक पाटील यांनी केले.
लोकांनी निर्भयपणे बोलायला सुरुवात केली, तर सार्वजनिक प्रश्नांवर व्यापक जनजागृती होईल आणि सकारात्मक बदलासाठी वातावरण निर्माण होईल. जनतेचा आवाज हा लोकशाहीचा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने सजग राहून आपल्या प्रश्नांवर बोलावे, संवाद साधावा आणि लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा, हा ‘बोल बिनधास्त’ उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे प्रतिक पाटील यांनी स्पष्ट केले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या