विजयपूर : कर्नाटकात सत्तांतरानंतर काँग्रेसने २०२८ च्या विधानसभा निवडणुकीची तयारी आतापासूनच सुरू केल्याचे राजकीय चित्र आहे. मुख्यमंत्रीपदाची धुरा डी. के. शिवकुमार यांच्याकडे आल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी ज्येष्ठ नेते बी. के. हरिप्रसाद यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील काँग्रेसच्या राजकारणात ‘शिव -हरी " अशी नवी समीकरणे चर्चेत आली आहेत.
माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दोन कार्यकाळांत राज्याच्या राजकारणावर ठसा उमटविला. मात्र, नेतृत्वबदलानंतर त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि डी. के. शिवकुमार यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारली. त्यानंतर काँग्रेसने २०२८ च्या निवडणुकीकडे लक्ष केंद्रित केल्याचे राजकीय घडामोडींवरून स्पष्ट होत आहे.
शिवकुमार यांची कार्यपद्धती आक्रमक संघटनशैली आणि राजकीय रणनीतीसाठी ओळखली जाते. मुख्यमंत्री झाल्यानंतर सरकारच्या कारभारावर लक्ष केंद्रित करताना पक्ष संघटनेची जबाबदारी हरिप्रसाद यांच्याकडे देण्यात आली आहे. हरिप्रसाद यांनी प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर देण्याचे संकेत दिले आहेत.
दरम्यान, २०२८ च्या निवडणुकीसाठी काँग्रेसमधील आमदारांच्या कामगिरीकडेही पक्ष नेतृत्वाचे लक्ष असल्याचे वृत्त आहे. नुकत्याच झालेल्या काँग्रेस विधायक पक्षाच्या बैठकीत शिवकुमार यांनी पक्ष संघटन मजबूत करणाऱ्या आमदारांनाच आगामी निवडणुकीत उमेदवारीच्या दृष्टीने महत्त्व मिळेल, असा स्पष्ट संदेश दिल्याचे वृत्त आहे.
राज्याच्या आर्थिक स्थितीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. हमी योजनांचा आर्थिक परिणाम, प्रलंबित देयके आणि विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याचा मुद्दा आगामी काळातही राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान, सिद्धरामय्या यांनी जुलै २०२६ मध्ये २०२८ ची विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले होते. मात्र, सक्रिय राजकारणात राहण्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत त्यांची राजकीय भूमिका काय असेल, याकडे काँग्रेसमधील तसेच विरोधी पक्षांचे लक्ष राहणार आहे.
२०२८ च्या निवडणुकीत काँग्रेससमोर भाजप आणि जनता दल (एस) यांच्या राजकीय समीकरणांचेही आव्हान असणार आहे. त्यामुळे सत्ताधारी काँग्रेसने आतापासूनच संघटनात्मक तयारी, मतदारांशी संपर्क आणि सरकारच्या कामगिरीचा प्रचार यावर भर देण्यास सुरुवात केली आहे.
काँग्रेसकडून २०२८ मध्ये पुन्हा सत्तेत येण्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे. मुख्यमंत्री शिवकुमार यांनीही पक्ष २०२८ मध्ये पुन्हा सत्तेवर येईल, असा दावा यापूर्वी केला आहे. मात्र, निवडणुकीपूर्वी बदलणारी राजकीय समीकरणे, विरोधकांची रणनीती आणि मतदारांचा कौल यावर अंतिम चित्र अवलंबून राहणार आहे.
एकंदरीत, मुख्यमंत्री म्हणून डी. के. शिवकुमार आणि प्रदेशाध्यक्ष म्हणून बी. के. हरिप्रसाद यांच्यावर काँग्रेसने सत्तेची आणि संघटनेची जबाबदारी विभागून दिली आहे. त्यामुळे आगामी काळात ‘ शिव -हरी, जोडीची राजकीय रणनीती आणि तिचा निवडणुकीतील परिणाम हा कर्नाटकाच्या राजकारणातील महत्त्वाचा विषय ठरणार आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या