सांगली प्रतिनिधी : मिरज शहरातील भारतनगर येथील ख्रिश्चन दफनभूमी परिसरात विनापरवाना पिस्टल बाळगणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. दर्शन अनिल कांबळे (वय २६, रा. ईदगाहनगर झोपडपट्टी, मिरज) आणि शेखर महावीर लोंढे (वय २९, रा. माजी सैनिक वसाहत, सह्याद्रीनगर, मिरज) अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत.
या कारवाईत दोन देशी बनावटीची पिस्टल, दोन जिवंत काडतुसे आणि हुंडाई कंपनीची व्हेन्यू चारचाकी असा एकूण ९ लाख १ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणातील आकाश ढिगे (रा. कोपल, जि. गदग, कर्नाटक) हा संशयित फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम सुरू आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार यांच्या पथकाकडून ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील पोलीस हवालदार अमोल पैदाळे आणि पोलीस कॉन्स्टेबल रोहन घस्ते यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, भारतनगर येथील ख्रिश्चन दफनभूमी परिसरात एका काळ्या रंगाच्या चारचाकी वाहनात दोन इसम पिस्टल घेऊन बसले आहेत.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यावेळी काळ्या रंगाचे वाहन तेथे आढळून आले. पोलिसांनी पंचांसमक्ष वाहनातील दोघांना ताब्यात घेत त्यांची अंगझडती घेतली.
झडतीमध्ये दर्शन कांबळे याच्या पॅन्टच्या मागील बाजूस, तर शेखर लोंढे याच्या पॅन्टच्या उजव्या बाजूस प्रत्येकी एक देशी बनावटीचे पिस्टल आढळून आले. दोन्ही पिस्टलच्या मॅगझीनमध्ये प्रत्येकी एक जिवंत काडतूस असल्याचे आढळले.
पिस्टल बाळगण्यासाठी आवश्यक कायदेशीर परवाना आहे का, अशी विचारणा पोलिसांनी केली असता दोघांकडेही कोणताही परवाना नसल्याचे समोर आले. चौकशीत शेखर लोंढे याने दोन्ही पिस्टल कर्नाटकातील आकाश ढिगे याच्याकडून घेतल्याची माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
त्यानंतर दोन्ही पिस्टल, दोन जिवंत काडतुसे आणि हुंडाई व्हेन्यू चारचाकी वाहन पंचांसमक्ष जप्त करण्यात आले. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल रोहन घस्ते यांनी महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३ व २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडून सुरू आहे. जिल्ह्यात अवैध अग्निशस्त्रे बाळगणारे तसेच शरीराविरुद्ध गंभीर गुन्हे करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध अशी कारवाई यापुढेही सुरू ठेवण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या