प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : येथील शासकीय महिला तंत्रनिकेतन आणि स्वावलंबी भारत अभियान, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थिनींसाठी उद्योजकता विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्राचार्य संदीप पाटील यांनी प्रास्ताविक करताना विद्यार्थिनींमध्ये उद्योजकतेची मानसिकता निर्माण होणे काळाची गरज असल्याचे सांगितले. यावेळी प्रमुख वक्ते जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य तथा स्वावलंबी भारत अभियानाचे समन्वयक मिलिंद सुतार आणि चार्टर्ड अकाउंटंट स्मिता पाटील यांचा प्राचार्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
मिलिंद सुतार म्हणाले, शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरीच्या मागे धावण्यापेक्षा उपलब्ध कौशल्याचा वापर करून स्वतःचा उद्योग अथवा व्यवसाय उभारण्याकडे तरुणांनी वळले पाहिजे. सुशिक्षित तरुणांची वाढती संख्या आणि उपलब्ध नोकऱ्यांचे प्रमाण पाहता उद्योजकतेची मानसिकता विकसित करणे ही काळाची गरज आहे. विद्यार्थिनींनी नवनवीन कल्पना, कौशल्य आणि दर्जेदार उत्पादनांच्या माध्यमातून उद्योगनिर्मितीचा विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले.स्मिता पाटील म्हणाल्या, महिलांनी ‘चूल आणि मूल’ या पारंपरिक चौकटीपलीकडे जाऊन उद्योग-व्यवसायाच्या नव्या संधी शोधल्या पाहिजेत. शिक्षणानंतर नोकरी करायची की व्यवसाय, व्यवसाय करायचा असल्यास कोणता व्यवसाय करायचा, हे स्पष्टपणे ठरवून योग्य नियोजन केल्यास यश मिळू शकते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इलेक्ट्रॉनिक विभागाच्या प्रा. तेजस्वी जाधव यांनी केले, तर इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी विभागाच्या प्रा. प्रियांका वाडकर यांनी आभार मानले. कार्यशाळेस इलेक्ट्रॉनिक व इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी विभागातील तृतीय वर्षाच्या विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या