विजयपूर : भावसार क्षत्रिय समाजाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक विकासाच्या दृष्टीने विविध महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. समाजाच्या उत्पन्नाचा उपयोग सामाजिक कार्यासाठी करण्याबरोबरच शैक्षणिक संस्था स्थापन करणे आणि होतकरू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला.
शहरातील आनंदनगर येथील भावसार सांस्कृतिक भवनात समाजाचे अध्यक्ष तथा महानगरपालिकेचे माजी उपमहापौर राजेश देवगिरी यांच्या अध्यक्षतेखाली ही वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात झाली.
प्रारंभी अतुल पुकाळे यांनी मागील सर्वसाधारण सभेचा वृत्तांत व वार्षिक अहवालाचे वाचन केले. सचिव दिपक शिंत्रे यांनी सन 2025-26 चा जमा-खर्च, नफा-तोटा पत्रक तसेच आढावा पत्रक सभेसमोर सादर केले. उपस्थित समाजबांधवांनी त्यास एकमताने मंजुरी दिली.
यावेळी अध्यक्ष राजेश देवगिरी यांनी सांगितले की, पुढील वार्षिक महासभेचे आढावा पत्रक समाजातील सदस्यांना पोस्टाद्वारे पाठविण्यात येईल. तसेच भावसार को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या यशस्विनी वैद्यकीय मदत योजना तसेच विविध आर्थिक योजनांचा समाजबांधवांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. सोसायटीची आर्थिक उलाढाल लाखो रुपयांवरून कोट्यवधी रुपयांपर्यंत पोहोचली असून, समाजातील गरजू सदस्यांना अधिकाधिक कर्ज उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली.
समाजातील एखाद्या सदस्याचे निधन झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना ₹11,000 आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला. समाजाच्या दोन्ही वास्तूंचा कर वेळेवर भरण्याबाबतही चर्चा करण्यात आली. सराफ बाजारातील समाजाच्या कार्यालयाच्या नूतनीकरणासाठी शासनाकडून आवश्यक मदत मिळवून विकासकामे करण्यात येणार असल्याचे देवगिरी यांनी सांगितले. तसेच दोन मुलांनंतर तिसरे अपत्य झाल्यास संबंधित कुटुंबाला ₹10,000 प्रोत्साहनपर बक्षीस देण्याची घोषणा करण्यात आली.
विवाह व निधनाच्या प्रसंगी समाजाच्या प्रथा-विधी वेळेवर पार पाडावेत, असे पंचमंडळाचे सदस्य उमेश देवगिरी यांनी आवाहन केले. अंत्यसंस्काराच्या वेळी समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दुःखद प्रसंगी संबंधित कुटुंबीयांच्या पाठीशी उभे राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
समाजाच्या विविध उपक्रमांमध्ये कार्यरत असलेल्या महिला मंडळ, युवक समिती, तरुण संघ तसेच भावसार क्रिकेट संघाच्या पदाधिकारी व सदस्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. कर्नाटक मराठी साहित्य परिषदेच्या जिल्हाअध्यक्षपदी दिपक शिंत्रे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच समाजाचे अध्यक्ष म्हणून यशस्वीपणे सेवाकार्य करणारे राजेश देवगिरी यांचाही सन्मान करण्यात आला. समाजातील ज्येष्ठ व्यक्तींचाही यावेळी गौरव करण्यात आला.
सभेत समाजाच्या आगामी वाटचालीसाठी एकजुटीने कार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. विविध ठरावांना उपस्थित समाजबांधवांनी एकमताने मंजुरी दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कन्हैया पेठकर यांनी केले, तर गोकुळ महिंद्रकर यांनी आभार मानले.
यावेळी व्यासपीठावर माजी उपाध्यक्ष तथा ज्येष्ठ समाजसेवक मिलन मिरजकर, उपाध्यक्ष विजय नवले, पंचमंडळाचे सदस्य विशाल पुकाळे, विनय पंतगे, श्रीयश महिंद्रकर, प्रकाश बळमकर आदी उपस्थित होते.
सभेस महिला मंडळाच्या गौरव अध्यक्षा पद्माताई इजंतकर, अध्यक्षा नंदा पुकाळे, युवक समितीचे अध्यक्ष नितीन मिरजकर, तरुण संघाचे अध्यक्ष विनायक कुंटे, भावसार क्रिकेट संघाचे दत्ता सुलाखे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, सदस्य तसेच समाजबांधव-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या