प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : स्वच्छ भारत अभियानांतर्गत विद्यार्थ्यांमध्ये घनकचरा व्यवस्थापनाबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद शाळा विजयनगर, कुपवाड येथे घनकचरा व्यवस्थापन जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत इयत्ता दुसरी ते सातवीतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
कार्यशाळेच्या प्रारंभी मुख्याध्यापक दयासागर बन्ने यांनी उपस्थितांचे स्वागत केले. मार्गदर्शक प्रेरणा गोतपागर यांनी विद्यार्थ्यांना कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन, कचऱ्याचे वर्गीकरण, ओला व सुका कचरा वेगळा करणे, कचरा कमी करणे तसेच पुनर्वापर व पुनर्चक्रणाचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले. दैनंदिन जीवनात स्वच्छतेच्या सवयी अंगीकारून पर्यावरण संवर्धनात प्रत्येकाने योगदान द्यावे, असे आवाहन करण्यात आले. प्रेरणा मॅडम यांनी चार कचऱ्यांचे प्रकार ओला कचरा, सुका कचरा, सॅनिटरी कचरा आणि घरगुती घातक कचरा याची माहिती विद्यार्थ्यांना दिली.
कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी समन्वयक नेताजी भोसले, अस्मिता भोकरे, श्री. इकबाल मुलाणी व पद्मजा कुलकर्णी यांनी विशेष सहकार्य केले. विविध उपक्रम, प्रश्नोत्तरे आणि कृतींच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना घनकचरा व्यवस्थापनाची माहिती सोप्या व प्रभावी पद्धतीने देण्यात आली.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमीन शेख, सदस्य व शिक्षणतज्ज्ञ मनोज आप्पा पवार, तसेच शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होते. कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छता, कचरा वर्गीकरण आणि पर्यावरण संरक्षणाबाबत जागरूकता निर्माण झाली.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या