प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : व्यवसायिकांना योग्य आर्थिक मार्गदर्शन मिळावे, विविध शासकीय योजनांचा लाभ घेता यावा, उपलब्ध कर्ज सुविधांची माहिती मिळावी तसेच व्यवसायातील अडचणींवर प्रभावी तोडगा काढता यावा, या उद्देशाने लोकमंगल परिवाराच्या वतीने लोकमंगल पतसंस्थेच्या माध्यमातून ‘व्यवसायिक मार्गदर्शन संवाद बैठक’ आयोजित करण्यात आली.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकमंगल पतसंस्थेचे संचालक प्रा.विठ्ठल ढेकळे होते. त्यांनी लोकमंगल पतसंस्था, लोकमंगल बँक व लोकमंगल मल्टिस्टेटच्या विविध सेवा-सुविधा, योजना आणि ग्राहकांसाठी उपलब्ध आर्थिक पर्यायांची माहिती दिली. व्यवसायिकांनी उपलब्ध आर्थिक सुविधांचा योग्य नियोजनाने वापर करून व्यवसायाची प्रगती साधावी, असे आवाहन त्यांनी केले.यावेळी तासगावचे सराफ व उद्योजक संतोष खेराडकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी व्यवसायातील आपले अनुभव, बदलत्या बाजारपेठेतील संधी तसेच व्यवसाय वाढीसाठी आवश्यक नियोजन आणि बाबींवर उपस्थित उद्योजकांशी संवाद साधला.कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते सचिन नाडगौडा यांनी शासन व विविध संस्थांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या योजनांची सविस्तर माहिती दिली. या योजनांचा उद्देश, त्यासाठीची प्रक्रिया आणि सर्वसामान्य नागरिक तसेच व्यवसायिकांनी त्याचा कसा लाभ घ्यावा, याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. उपलब्ध संधींचा योग्य वापर करून आर्थिक प्रगती साधण्याचे आवाहनही त्यांनी केले.लोकमंगल बँकेचे अधिकारी अभिजित भोईटे यांनी शासकीय कर्ज योजना तसेच विविध कर्ज सुविधांची माहिती दिली. तर लोकमंगल पतसंस्थेचे विभागीय अधिकारी रेवण सिद्धापूरे यांनी पतसंस्थेच्या विविध योजना, कर्ज सुविधा, ठेवी व ग्राहक सेवांची माहिती उपस्थितांना दिली.
या संवाद बैठकीत व्यवसायिकांनी आपल्या व्यवसायातील विविध अडचणी व समस्या मांडल्या. त्यावर उपस्थित मान्यवर व अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन करून उपलब्ध योजना व आर्थिक सुविधांच्या माध्यमातून समस्यांचे निराकरण करण्याबाबत माहिती दिली. त्यामुळे हा उपक्रम केवळ मार्गदर्शनापुरता मर्यादित न राहता व्यवसायिकांच्या अडचणी समजून घेऊन त्यावर थेट संवाद साधणारा उपक्रम ठरला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक लोकमंगल पतसंस्था, तासगाव शाखेच्या शाखाधिकारी शुभांगी तोडकर यांनी केले. सूत्रसंचालन लोकमंगल मल्टिस्टेटचे विभागीय अधिकारी विश्वनाथ चव्हाण यांनी केले, तर आभार लोकमंगल पतसंस्थेच्या कोल्हापूर शाखेचे शाखाधिकारी कुंदन टाकमोरे यांनी मानले.यावेळी शाखेचे सल्लागार पी. आर. पाटील, बाळासाहेब मोरे व एम. डी. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास लोकमंगल बँकेचे कर्मचारी ओंकार मेहतर, लोकमंगल पतसंस्थेचे अधिकारी व कर्मचारी तसेच दैनिक पुण्यनगरीचे वार्ताहर शिवाजी माळी उपस्थित होते.लोकमंगल परिवाराचे संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री तथा दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष (बापू) देशमुख यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम आयोजित करण्यात आला. समाजातील सर्वसामान्य नागरिक, व्यवसायिक व उद्योजकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी तसेच विविध आर्थिक व शासकीय योजनांचा लाभ तळागाळातील घटकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने लोकमंगल परिवाराच्या वतीने अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्यात येत आहे.आर्थिक पाठबळासोबत योग्य मार्गदर्शन आणि योजनांची अचूक माहिती देत व्यवसायिकांना सक्षम करण्याचा लोकमंगल परिवाराचा हा उपक्रम उद्योजकांसाठी निश्चितच मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या