सांगली प्रतिनिधी : केरळ येथे झालेल्या १८व्या इंटरनॅशनल डॉक्युमेंट्री अँड शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलमध्ये सांगलीचे सुपुत्र व राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक शेखर बापू रणखांबे दिग्दर्शित ‘भिंतीला पाठ’ या लघुपटाने सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार पटकाविला. केरळचे मुख्यमंत्री व्ही. डी. सतीशन आणि पर्यटन व सांस्कृतिक मंत्री पी. सी. विष्णूनाद यांच्या हस्ते रणखांबे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
शेखर बापू रणखांबे यांनी यापूर्वीही आपल्या प्रभावी दिग्दर्शनातून राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या ‘पॅम्पलेट’ आणि ‘रेखा’ या लघुपटांनी देश-विदेशातील विविध महोत्सवांमध्ये पुरस्कार मिळविले आहेत. ‘रेखा’ या लघुपटासाठी त्यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
नुकताच त्यांच्या दिग्दर्शनाखालील, झी टॉकीज प्रस्तुत आणि संजय झणकर व गौरी झणकर निर्मित ‘रुबाब’ हा मराठी चित्रपटही प्रदर्शित झाला आहे. त्यानंतर ‘भिंतीला पाठ’ या लघुपटाला केरळमधील प्रतिष्ठित महोत्सवात मिळालेला सर्वोत्कृष्ट पुरस्कार त्यांच्या कारकिर्दीतील आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला आहे.
‘भिंतीला पाठ’मध्ये साक्षी गिड्डे, तेजस्विनी करके आणि जयश्री बिरलिंगे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. वैभव कांबळे व आदित्य तांबे यांनी या लघुपटाची निर्मिती केली आहे. प्रियशंकर घोष यांनी छायाचित्रण, तर मंदार कमलापूरकर यांनी ध्वनीची जबाबदारी सांभाळली आहे. तसेच मुख्य सहाय्यक दिग्दर्शक विक्रम शिरतोडे, लाइन प्रोड्युसर विजय देवकर आणि संकलन राज साबळे यांचे आहे.
शेखर बापू रणखांबे यांच्या या यशामुळे सांगलीच्या चित्रपट क्षेत्राच्या लौकिकात भर पडली असून, त्यांच्या यशाबद्दल कला, चित्रपट आणि सांस्कृतिक क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या