प्रतिष्ठा न्यूज /अक्षय कोठावळे
पेठ वडगाव : क्रेस्ट अबॅकस अकॅडमी, भादोले यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली राज्यस्तरीय अंकगणित स्पर्धा मोठ्या उत्साहात आणि यशस्वीरीत्या पार पडली. या स्पर्धेत कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत आपल्या गणितीय कौशल्याचे प्रभावी प्रदर्शन केले.
कार्यक्रमास शिव स्वामी सर्वहिताय बहुद्देशीय संस्था, कोल्हापूर महाराष्ट्रचे अध्यक्ष राहुल सावर्डेकर हे प्रमुख उपस्थित म्हणून लाभले होते. तसेच प्रा. डॉ. मनीषा सावंत या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यावेळी संस्थेचे सचिव प्रा. नितीन कदम, संचालक उमेश पाटील आणि योगेश कांबळे यांचीही उपस्थिती लाभली.
स्पर्धेचे नियोजन नागेश कुरणे यांनी उत्कृष्टरीत्या केले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिषेक दिवेकर यांनी प्रभावी शैलीत पार पाडले. विद्यार्थ्यांमध्ये गणिताविषयी आवड निर्माण व्हावी आणि त्यांच्या बौद्धिक क्षमतेला चालना मिळावी या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेला पालक व नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
स्पर्धेतील विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. मधुरा विनायक माळी हिने प्रथम क्रमांक पटकावत ग्रँड प्राईज म्हणून सायकल जिंकली. तर तारदाळ येथील संस्कृती मंगेश शिंदे हिने अवघ्या ४ मिनिटे १०० सेकंदांत १०० गणिते अचूक सोडवत स्मार्ट वॉच पुरस्कार पटकावला. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीचे उपस्थितांकडून विशेष कौतुक करण्यात आले.
विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढविणारा आणि गणित विषय अधिक रंजक बनविणारा हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी क्रेस्ट अबॅकस अकॅडमीचे पदाधिकारी, शिक्षक आणि स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले. भविष्यातही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशाच दर्जेदार शैक्षणिक स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या